लडाख जीप सफारी

Post Image
JULY 2017

लडाख जीप सफारी

जीप एक वळण घेऊन थांबली आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना. दूरवरच्या निळ्याशार पेंगोंग लेकचं पहिलं दर्शन. कुठल्याही फोटोत चित्रबध्द करता येणार नाही आणि कोणत्याही शब्दात वर्णन करता येणार नाही असा अविस्मरणीय अनुभव.

पॅंगॉन्ग लेकची गहिरी नितळ निळाई, दोन्ही बाजूनी वेढणारी बर्फाच्छादित पर्वत शिखरे, स्वच्छ निळे आकाश, मध्येच उडणारा एखादा पांढरा शुभ्र पक्षी, वाऱ्याच्या हलक्या झुळुकेनी नितळ पाण्यावर उठणारे तरंग आणि फक्त आपलाच आतला आवाज ऐकू येईल इतकी नीरव शांतता.

खरंच सांगते आजवर मेडिटेशनची इतकी सेशन्स अटेंड केली पण पॅंगॉन्ग लेकच्या काठावर बसून अनुभवलेल्या त्या काही तासांची असीम अनुभूती अजूनतरी मला परत कुठे सापडलेली नाही. इतकं पवित्र, इतकं निर्मळ आणि इतकं blissful, serene मला परत क्वचितच कधी वाटलं.

माझा भाऊ अमित लेह लडाखला जाऊन आला आणि मला म्हणाला, " वैशाली, तुम्ही एकदा तरी जाऊनच या. आणि जायचं तर फक्त केदार गोगटे बरोबर ".

एरवी कुठे फिरायला जायचे म्हणजे मी खूप Googling करते, पण या वेळेस केदारला फक्त एक फोन आणि त्या फोनवर त्याने लडाख जीप सफारीचे इतकं छान वर्णन केलं की पहिल्यांदाच आम्ही अशी सहा महिने आधी ट्रीप ठरवून मोकळे झालो.

बाकीच्या टूर कंपनी नेतात त्याच्या बऱ्याच आधी Green Earth ची टूर प्लॅन होते. बर्फ नुकतंच वितळायला लागलं असतं, रस्ते मोकळे व्हायला लागले असतात, थंडीच्या महिन्यात बाहेर गेलेली लडाखची माणसे आपापल्या गावी परतलेली असतात. इतर प्रवाशांची फार गर्दी आणि गोंगाट नसतो. जुलै -ऑगस्ट नंतर लडाखला जाऊन AC जीप मधून फिरण्यात काय मजा?

आमची ट्रीप श्रीनगरपासून सुरु झाली. पीरपंजाल रांगांमधला ‘झोजिला पास’ हा श्रीनगर लेह मार्गावरचा एक महत्वाचा टप्पा. आम्ही जायच्या आधी दोन-तीन दिवस तिथे मिलिटरीच्या वाहनांची खूप वाहतूक असल्याने पहाटे चार वाजताच निघालो. काळोखातले मोकळे रस्ते, हवीहवीशी वाटणारी थंडी आणि जीपमधल्या गाण्यांचा रिदम. सोनमर्गला आमच्या ग्रुप मधले काहीजण आधीच पोचून ग्लेशिएयर बघून आले होते. ब्रेकफास्ट घेऊन आम्ही ताजेतवाने होईपर्यंत आमचं सगळं सामान छानपैकी टॅपोलिन शिट्सने कव्हर करून टपावर जाऊन बसले होते. आणि सगळे ड्रायव्हर्स आम्हाला पुढे घेऊन जायला तयार होते.

बर्फामध्ये, निसरड्या रस्त्यांवरून जीप चालवणे म्हणजे कौशल्याचेच काम. सगळीकडे स्वतःची गाडी आधी दामटणाऱ्या पुणेकरांना तर सगळ्या ड्रायव्हर्सचे आपापसातील coordination, understanding बघून थक्कच व्हायला होते.

हिमशिखरांच्या रांगा, बर्फात कोरून काढल्या सारखा जेमतेम एक वाहन जाऊ शकेल असा चिंचोळा रस्ता, अवघड वळणे आणि दुसऱ्या बाजूला दरी. बर्फ वाहून चिखल झाल्याने निसरड्या रस्त्यावरून सावकाश जात आम्ही झोजिला पास पाशी पोचलो. दोन्ही बाजूला बर्फाच्या उंचचउंच भिंती आणि मधून जाणारी आपली जीप. दोन डोळ्यात किती आणि काय साठवूंन ठेवावे तेच कळत नाही.. नजर जाईल तिथपर्यंत बर्फ आणि बर्फच.

कुठ्लाही ट्रॅफिक जाम न लागता अपेक्षेपेक्षा लवकर झोजिला पास क्रॉस केल्याचा आनंद आम्ही बाहेर उतरून, बर्फात खेळून, फोटो काढून साजरा केला

आता पुढचे ठिकाण द्रास. जगातले असं दुसऱ्या क्रमांकावरचे ठिकाण जिथे अतिशय कडाक्याच्या थंडीतही लोक गाव सोडून न जाता याच गावात राहतात.

द्रासला आम्ही जेवलो ते हॉटेल म्हणजे एक छोटीशी खाणावळच होती. सहा महिन्यांच्यासुट्टीनंतर त्याच दिवशी हॉटेल सुरु झाले होते. भट्टीतल्या गरमागरम रोट्या, डाळ, भात, साग. त्या जेवणाची लज्जतच न्यारी. केदारच्या ट्रीपचं हे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे जिथे जाऊ तिथले वेगवेगळ्या चवीचे जेवण. हिमालयात जाऊन जर रोज पुरण पोळी, श्रीखंड पुरी असे बरोबरच्या आचाऱ्याने बनवलेलं जेवण असेल तर मग तिथल्या खास पदार्थांची चव कधी आणि कशी घेणार?

द्रासलाच मी पहिल्यांदा गुरगुर चहाची चव घेतली. लोणी, मीठ असलेला हा चहा तिथल्या वातावरणात लागणारी ऊर्जा लगेच देतो. तसाच दुसरा चहा खुनाक. पुढचे काही दिवस आम्ही वाटेत हा चहा एन्जॉय केला.

आता पुढचे ठिकाण द्रास. जगातले असं दुसऱ्या क्रमांकावरचे ठिकाण जिथे अतिशय कडाक्याच्या थंडीतही लोक गाव सोडून न जाता याच गावात राहतात.

द्रासमधले महत्वाचे ठिकाण म्हणजे विजयपथ - वॉर मेमोरियल.

कारगिल युद्धाच्या बातम्या आपण फक्त वाचल्या किंवा पहिल्या होत्या. टायगर हिल्स, तोलोलिंग आणि आसपासची सगळी शिखरं पाकिस्तानने काबीज केली होती. अतिशय प्रतिकूल हवामानात जीवाची बाजी लावून विजय खेचून आणणाऱ्या आपल्या सैनिकांच्या शौर्याच्या कथा तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांकडून ऐकणं हा एक रोमांचकारी अनुभव आहे. प्रत्येक भारतीयाने आणि विशेषतः आपल्या मुलांनी, तरुण पिढीने एकदा तरी विजयपथला भेट द्यायलाच हवी.

त्या दुपारीच आम्ही कारगिलला पोचलो. छोटंसं गाव आणि बाहेर मुसळधार पाऊस. मग बाहेर कुठेही न भटकता हॉटेलमध्येच पत्ते आणि गप्पांची मैफल आणि जोडीला वाफाळता चहा.

दुसऱ्या दिवशी प्रवास सुरु झाला लेहच्या दिशेने. दिवसभर वाटेतल्या बऱ्याच गोष्टी बघत बघत संध्याकाळी लेहला पोचायचा प्लॅन होता.

कारगिलजवळ मिलिटरीचा मोठा बेस आहे. मिलिटरीचे कॉन्व्हॉय बरेचदा लागतात. ‘मुलबेख’ इथली चंबा देवीची पुरातन भव्य मूर्ती बघून आम्ही ‘नामिकी ला’ पासला पोचलो. ‘नामिकी ला’ म्हणजे ‘आकाशाला दिलेला टेकू’. १२००० फुटापेक्षा जास्त उंची असलेला हा पास आणि पुढचा दुसरा पास ‘फाटू ला’. ह्याची उंची १३०००फुटांपेक्षा जास्त. श्रीनगर - लेह मार्गावरचा हा सर्वात उंच पास आहे.

हे पास क्रॉस केले की हळू हळू बर्फाच्छादित शिखरं मागे पडून लांबचलांब करडे पर्वत दिसायला लागतात. हिरव्या रंगाचा मागमूसही नाही. पर्वत रांगा आणि त्यातून जाणारा नागमोडी रस्ता पार करून ‘लामायुर’ इथे मोनेस्टरी बघायला थांबलो. मोनेस्टरीच्या मागच्या बाजूने दगडी पायऱ्या उतरत, आसपासची ठिकाणं बघत खाली आलो. वाटेत कुठे जेवणाची सोय नसल्याने पॅक्ड जेवण बरोबर आणले होते. पण परत केदारच्या स्टाइलने आम्ही चक्क वाटेत एका घरापाशी थांबलो.

घरामागे ऐसपैस हिरवळ आणि मधूनच सावली साठी झाडं.अगत्यशील अशा त्या लडाखी महिलेने आमचं मनापासून स्वागत केलं आणि आमच्यासाठी एका खास प्रकारच्या उंच लाकडी भांड्यात रवीने घोटून गुरगुर चहा बनवला. वनभोजन आणि हिरवळीवर छोटीशी वामकुक्षी... केवळ अफलातून !!

लामायुर जवळच निमू या गावात सिंधू आणि झान्स्कर नदीचा संगम आहे. त्यानंतर लागणाऱ्या 'मॅग्नेटिक हिल ' हा एक निसर्गाचा चमत्कार. त्या भागाची रचना आणि आसपासचे चढ उतार या मुळे दृष्टीभ्रम होतो. आपली गाडी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वर चालली आहे असा आपल्याला भास होतो पण खरंतर गाडी खालीच जात असते.

लेहला पोचायच्या आधी बघतलेलं दिवसातले शेवटचं ठिकाण म्हणजे ‘बडा पत्थर साहिब गुरुद्वारा’. त्यांच्या पद्धतीनुसार सगळ्यांना डोक्यावर रुमाल बांधून आत जावे लागते. ग्रंथ साहिबचे पठण चालू असते. लंगर मधला प्रसाद घेऊन निघालो आणि संध्याकाळ होताना लेहला पोचलो. हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीनं आमचं स्वागत करण्यात आलं. रात्रीचं जेवण होताच सगळ्यांनी पडी टाकली.

द्रासमधले महत्वाचे ठिकाण म्हणजे विजयपथ - वॉर मेमोरियल.

आता एक दिवस बाहेर कुठे न जाता लेह मध्ये जरा आराम आणि तिथेच भ्रमंती. सकाळी निवांत लेहच्या बाजारात भटकलो. तिथे चायनीज पद्धतीची क्रोकरी अतिशय छान मिळते. वेगवेगळ्या मण्यांच्या माळा, सोवेनिर, हँडीक्राफ्टस, उंची गालिचे, शाली आणि खास तिबेटी उबदार कपडे तसंच एम्ब्रॉयडरी केलेले टी शर्ट्स यांनी लेहची बाजारपेठ सजली आहे.

दुपारी आम्ही आसपासची ठिकाणं पाहायला बाहेर पडलो. 'दृक पद्म कारपो ' म्हणजे 'White Lotus School '. ही आपल्या 'थ्री इडियट्स' मधल्या रँचोची शाळा. गरीब घरातली, आजूबाजूच्या गावातली तसंच दूरवरच्या भागातली मुलं इथे शिकायला येतात. शाळेत होस्टेल पण आहे. पर्यावरण पूरक बांधकाम, उन्हाळ्यात गार आणि थंडीत उबदार राहील अश्या प्रकारे बनवलेल्या काचेच्या खिडक्या आणि भिंती, सौर ऊर्जेचा जमेल तेवढा वापर, असं या शाळेचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीचं सगळं शिक्षण लडाखी भाषेतूनच दिलं जातं.

तिथून पुढे लागतं ' शे ' हे गाव. शे गावातच एक जुना राजवाडा आहे. आजूबाजूच्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे बरेच छोटे छोटे स्तूप बांधलेले दिसतात. देवाला अर्पण केलेल्या धातूच्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात. पूर्वीच्या काळी कोणी काही वाईट काम केलं की शिक्षा म्हणून असे स्तूप त्यांच्याकडून बांधून घेत.

हेमिस आणि ठिकसे या लेह जवळच्या दोन जुन्या मोनेस्टरी.

द्रासमधले महत्वाचे ठिकाण म्हणजे विजयपथ - वॉर मेमोरियल.

बहुतेक सगळ्या मोनेस्टरिंची रचना साधारणपणे सारखीच असते. वर जायला पायऱ्या-पायऱ्यांचा रस्ता, कमानीतून किंवा दिंडी दरवाजातून आत शिरलं की मोठं आवार, आवारात काही बैठं बांधकाम तर काही दुमजली इमारती, राहण्याच्या खोल्या, स्वयंपाकघर वगैरे. पडवीसारख्या भागात आकर्षक रंगसंगतीतली भित्तीचित्रं आणि त्या चित्रांमधून मांडलेल्या जुन्या कथा. थोडं अजून वर चालून गेलं की एक सभामंडप, तिथे बुद्धाची मूर्ती, शेजारीच बुद्ध भिक्षूंची मोठी क्लास रूम. तिथे बसायला बाक नाहीतर भारतीय बैठक. सगळं जुन्या लाकडाचं काम. मंद तेवणाऱ्या समया, शांत आवाजात मंत्रघोष आणि धीरगंभीर, पवित्र वातावरण. नकळत मनाला एक प्रकारची शांतता मिळते. ठिकसे मोनेस्टरी मध्ये खूप सुंदर रंगकाम केलेली बुद्धाची विशाल मूर्ती आहे. हे सगळं रंगकाम खूप जुनं आणि नैसर्गिक रंगांमधलं असावं पण आजही हे रंग खूप ताजे आणि प्रसन्न वाटतात.

लेहमधलं आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे शांतीस्तूप. संध्याकाळ खुणावायला लागली होती. वळणावळणांचा रस्ता पार करून वर गेलो. भन्नाट गार वारा, आकाशात पश्चिमेला मावळतीच्या रंगांची उधळण, चहूबाजूला हिमशिखरे आणि मध्यभागी शांती स्तूप. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने शांतीस्तूपाचे दर्शन हा केवळ अविस्मरणीय अनुभव होता.

पुढच्या दिवशीचा प्रवास उत्साहात सुरु झाला. खास आकर्षण होते ‘खारदूंग ला’ पास. उंची १८००० फुटांहून जास्त पण जगातला सर्वात जास्त उंचीवरचा Motorable रोड असलेला हा पास आहे. आज परत घाटरस्ता, पूर्ण हिमशिखरांमधून. लढाखच्या प्रवासात विरळ हवेमुळे त्रास होऊ शकतो पण प्रवासाला निघायच्या दोन दिवस अगोदरच आम्ही Diamox च्या गोळ्या सुरु केल्याने आणि वेळोवेळी केदारच्या सूचना पाळल्याने आम्हाला कोणालाही high altitude sickness वगैरे जाणवला नाही.

हा पास पार करण्यापूर्वी वाहनांची तपासणी केली जाते. गरज असेल तर टायरभोवती लोखंडी चेन गुंडाळावी लागते. म्हणजे बर्फावरून गाडी चालवणे जरा सोपे जाते. इथे लडाख रेंजचा मिलिटरी बेस आहे. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ इथे कोणाला पोस्टींग देत नाहीत कारण इतक्या उंचीवर जास्त दिवस राहणे फार कठीण आहे.

खारदूंग ला पास च्या इथे एक छोटेसे हॉटेल आहे. इतक्या उंचीवरही गरम चहा मिळतो. ठिकठिकाणी लोकांनी पताका लावल्या आहेत. कदाचित ती त्यांची नवस वगैरे फेडायची पद्धत असेल.

घाट उतरून आम्ही ‘खारदूंग’ गावात आलो. 'C ' आकाराच्या रस्त्यावर मध्यभागी एक छोटे हॉटेल वजा घर आहे. बाहेर एक दगडी पाटी आहे 'खुंगशुक वांगडू' च्या नावाची. 'थ्री इडियट्स' ची टीम बहुतेक इथेच थांबली असावी आणि हे नाव उचललं असावं. आता जरा कमी उंचीवर आल्यानं आणि थोडं उन्हात बसायला मिळल्यानं छान उबदार वाटायला लागलं होतं. मस्त पैकी चहा, गरम गरम मॅगी आणि खास लडाखचा 'थुक्पा ' हा पदार्थ. म्हणजे भाज्या घालून केलेली वरणफळंच म्हणाना.

दलडाख मध्ये मनुष्यबळ कमी दिसले. आपल्याकडे हायवेवर दिसतात तशी ठिकठिकाणी हॉटेल्स, धाबे नाहीत. छोटीशी दुकानं वजा हॉटेल्स. चहा, बिस्किटं, मॅगी असे पदार्थ मिळणारी. दुकान चालवणारा एखादाच माणूस. तोच चहा बनवणार, तोच बिस्कीट विकणार, तोच कप विसळणार. त्यामुळे इथे खरीखुरी 'self service 'असते. कधीतरी अशा हॉटेलमध्ये खूप गर्दी असेल तर आमचे ड्रायव्हर्स उतरून पटकन त्या दुकानदाराला जेवण बनवायला पण मदत करायला लागायचे.

आता प्रवास सुरु झाला नुब्रा व्हॅलीच्या दिशेने. परत एकदा पर्वत रांगांचा रंग बदलायला लागला होता. शोक नदीच्या काठाने जाताना कधी लाल जांभळे, कधी हिरवे, कधी तपकिरी तर कधी चक्क सोनेरी पर्वत दिसू लागले. ऋतुमानानुसार, हवामानानुसार आणि जमिनीतल्या खनिजांमुळे ह्या नानाविध छटा दिसतात. निसर्गाची किमया!! रंगीबेरंगी पर्वत रांगा, आणि त्यातून Border Road ने बनवलेले लांबचलांब रस्ते, छोटेसे पूल आणि गाडीत ‘आराधना’ची किशोर कुमारची गाणी. हा रस्ता संपूच नये असं वाटत होतं.

नुब्रा व्हॅलीत आमचा मुक्काम होता 'सुमूर 'या गावात. छोट्या टेकडयांनी वेढलेल्या जागेवर तंबू उभारले होते. बाहेर गप्पा मारत बसायला मोकळी जागा. आसपास उंच झाडांमधून जाणाऱ्या पायवाटा. नकट्या नाकाची, सफरचंदी गालांची मुलं आसपास खेळत होती आणि त्यांच्या आया आमच्यासाठी प्रेमाने जेवण बनवत होत्या. जेवणानंतर मस्त ताणून दिली. दुपार कलंडली तरी तिथून निघावंसच वाटत नव्हतं पण 'Double Hump Camel Ride ' पण घ्यायची होती.

जवळच असलेली डिस्किट मोनेस्टरी बघून वाळवंटात पोचलो. उंटावर बसून निघताच छोटी पिल्लं आईच्या मागे धावत यायला लागली, आपापसात शर्यत लावायला लागली. मजाच होती सगळी. रात्री तंबूबाहेर खुर्च्या टाकून निवांत गप्पा आणि आकाश बघणं हाही एक मस्त अनुभव.

नुब्रा व्हॅलीपासून ' सियाचिन ग्लेशिएयर ' फक्त ९० किमी अंतरावर आहे. भारताच्या अगदी सीमेजवळची ही सगळी ठिकाणं. सुमूरच्या जवळच 'पॅनामिक ' इथे गरम पाण्याचे झरे आणि कुंड आहेत. ती कुंड आणि वाटेत याराप्सो लेक बघून परतीचा प्रवास सुरु केला

पुढचा एक दिवस पॅंगॉंग लेकचा स्वर्गीय अनुभव घेऊन आलो आणि मग शेवटचा दिवस परत लेहमध्ये. लडाखच्या ट्रीपमध्ये लहरी निसर्ग, आयत्यावेळी येणाऱ्या अडचणी, अचानक बंद होणारे रस्ते यामुळे केदार नेहमी एक दिवस जास्त ठेवतो. कारण ठरलेल्या प्लॅनमध्ये कधीही बदल करावा लागू शकतो. पण आमच्या सुदैवाने आमची ट्रीप एकदम 'On Track ' होती. त्यामुळे आम्हाला लेहमध्ये एक दिवस परत फिरता आले.

तिथे प्रत्येकाने आवर्जून बघितलंच पाहिजे असं अजून एक ठिकाण म्हणजे ' Hall of Fame ' म्युझियम. भारत -पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय सैन्याने हे म्युझियम बांधले आहे. कारगिल युद्धाच्या तयारीच्या, आपल्या सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या, आणि विराट विजयाच्या छोट्या फिल्म्स बघण्यासाठी एक लहानसे थिएटर आहे. त्या फिल्म्स बघताना अंगावर अक्षरशः काटा येतो.

'The Last Post ' हे कॅप्टन विजयंत थापर ह्याने अखेरच्या मोहिमेवर जाण्याच्या आधी आई वडिलांना लिहिलेले पत्र हेलावून टाकते आणि त्याचवेळेस मनोमन आपण त्याला एक 'कडक सॅल्यूट ' ठोकतो. वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे, सियाचिन मधल्या सैनिकांचा खास पोशाख, त्यांच्या छोट्याश्या तंबूची प्रतिकृती बघताना आपले सैनिक किती कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीत राहून कर्तव्य बजावत असतात ते समजते. आपली सुरक्षितता आपण जवळपास गृहितच धरलेली असते. पण त्याची खरी किंमत हे म्युझियम बघताना कळते.

म्युझियमच्या प्रवेशद्वाराजवळ हिमालयातल्या सगळ्या पर्वतरांगांचे एक मोठे मॉडेल करून ठेवले आहे. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात नकाशात बघितलेल्या पर्वतरांगा खरंच केवढ्या विस्तीर्ण पसरल्या आहेत हे समजतं. केदार त्या सगळया पर्वतरांगा आणि तिथले Green Earth चे ट्रेक्स याची पण माहिती देतो.

परतीचा प्रवास लेह-दिल्ली विमानाने. इथला विमानतळसुद्धा सगळीकडून टेकड्यांनी वेढला आहे. अतिशय अनुभवी आणि कुशल वैमानिकच इथे टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतात आणि ते सुद्धा सकाळच्या काही तासांमध्येच.

लेह-दिल्ली, दिल्ली -पुणे. परतीचा प्रवास जवळजवळ निःशब्दच झाला. दरवेळेस कुठे बाहेर गेलं की घरची ओढ लागते, पण यावेळेस पहिल्यांदाच असं वाटलं की एअरपोर्टवर न उतरता, घरी न जाता सरळ परत लडाखलाच जावं. आल्यावर कितीतरी दिवस low altitude चा त्रास होत होता.

खरोखरच प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी अशी ही सात दिवसांची लेह लडाखची सफर.

काश्मिरपासून नुब्रा व्हॅली पर्यंत रोज बदलत जाणारा निसर्ग.

कधी बर्फाच्छादित तर कधी रंग बदलणारे पर्वत.

हिरवी गार वृक्षराजी मागे टाकून कधी फक्त पांढरा रंग, कधी करडे वाळवंट, कधी जर्दाळू, अक्रोडाची झाडं आणि हिरवळ तर कधी खळाळणाऱ्या पाण्याशेजारच्या विलोच्या रांगा.

बदलत जाणारी भाषा, बदलत जाणारा धर्म, बदलत जाणारी माणसांची चेहरेपट्टी, पेहराव आणि अर्थात जीवन पद्धती.

कधी पठारावर किंवा दरीत विखुरलेली घरं तर कधी मोनेस्टरी जवळ डोंगरउतारावर केलेली बांधकामं.

प्रत्येक पास जवळ बांधलेल्या रंगीबेरंगी पताका.

पारंपरिक वेशातल्या काश्मिरी किंवा लडाखी महिला. कधी लाल, पिवळ्या, भगव्या वस्त्रातले बौद्ध भिक्षू आणि कधी कडक युनिफॉर्म मधले मिलिटरीचे जवान.

कधी कमळ काकडी ची भाजी तर कधी थुपका. कधी कहावा, कधी खुनाक तर कधी गुरगुर चहा.

लडाखचं कितीही वर्णन केलं तरी अपुरंच आहे. इथे आल्यावर परत एकदा कळतं ' Change is the only Constant’.

अतिशय नियोजनबद्ध तरीही अगदी अनौपचारिक, घरगुती वाटावी अशी ट्रीप. दर्जात कुठेही तडजोड नाही पण कुठेही बाजारूपणाही नाही.

१२ पासून ७५ वर्षांपर्यंत वयोगटातले आम्ही सगळे घडीचे प्रवासी पण पटकन मैत्री जुळली (आणि ती अजूनही टिकून आहे). प्रत्येकाचा उत्साह तितकाच दांडगा. डिस्किट मोनेस्टरीला सगळ्यात जास्त संख्येने भेट देणारा ग्रुप आमचाच.

'आमचं माणूस तुमच्या बरोबर ' असं काहीही न म्हणता खरोखर आपलेपणाने सगळ्यांची काळजी घेणारा केदार. आलटून पालटून प्रत्येक जीप मध्ये बसून त्या त्या ग्रुप बरोबर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारून सर्वांना खरंच ‘स्पेशल ‘ असण्याचा अनुभव देणं इतकं सोपं नाही.

केदारबरोबर जाण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची त्याला असलेली माहिती. या प्रवासात आम्ही हिमालयातले कितीतरी पक्षी पाहिले. snow cocks, black billed Magpie, Griffon vultures पासून खूप उंचीवर उडणारे Golden Eagles. आणि छोटे छोटे प्राणी म्हणजे Pika, mormmots पासून blue sheep ( भरल ) आणि Kiyang म्हणजे रान गाढवंहि दिसली. आमच्या बरोबरचा अर्जुन, त्याची wildlife photography आणि त्याच्या केदारबरोबरच्या प्राणी पक्ष्यांवरच्या गप्पा ऐकणं आमच्यासाठी एकदम interetsting असायचं.

कुठल्याही भागाची जास्त ओळख होते तिथल्या माणसांशी बोलून, तिथले पदार्थ चाखून. नाही तर उरतो फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंतचा प्रवास आणि ' Photo Stops '. या ट्रिपमध्ये 'Photo Stop 'च्या पलीकडलं खूप काही बघायला मिळालं. अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण समाज. Happiness Index मध्ये आघाडीवर असलेल्या लडाखमध्ये आपला पण Happiness Index वाढतोय हे सतत जाणवत होतं.

इतर कुठल्याही प्रोफेशनल ट्रीप मध्ये मिळणार नाहीत अशा खूप 'हटके 'गोष्टी आम्ही एन्जॉय केल्या.

बागेतलं जेवण, डिस्किट मोनेस्टरी पाठीमागची बऱ्याच पायऱ्या उतरून लागणारी जुनी पाण्याची विहीर बघणं, वाटेतल्या एका छोट्याशा गावात घेतलेले जर्दाळू, पॅंगॉन्ग लेकला जाताना वाटेत थांबून मोठमोठ्या दगडांवर बसून केलेला ब्रेक फास्ट, याराप्सो लेक जवळचा वाळवंटातला छोटा ट्रेक किंवा डिस्किट मोनेस्टरी मध्ये सगळ्यांनी मिळून केलेली 'ओंकार साधना '. खारदूंग ला पास बऱ्याच जणांनी पहिला असेल, पण इतक्या उंचीवर सलग पन्नास push ups मारण्याचा सामुदायिक विक्रम मात्र आमच्याच ग्रुप मधल्या काही जणांनी केला. सगळंच धमाल!!!

ही ट्रीप संपली तेव्हाच ठरवलं, पाच वर्षांनी पुन्हा एकदा लडाखला जायचं.

केदारकडे तो प्लॅनही तयार आहे. मनालीहून लेह, वाटेत रोहतांग, बारालाचा ला, नाकी ला, लाचुंग ला आणि तांगलांग ला असे पाच पास क्रॉस करायचे. 'जिस्पा', 'केलॉंग' सारखी सुंदर गावं, १५००० फुटावरचे 'मोरी प्लेन्स' हे विस्तीर्ण पठार,'त्सो मोरिरी' आणि 'त्सोकर' इथले पक्षी,आर्य संस्कृती मधलं 'दा हनू 'हे गाव, हेमिस नॅशनल पार्क इथे ट्रेकिंग आणि लडाख मधल्या घरात राहायचा अनुभव.

मला खात्री आहे की ती ट्रीप पण एकदम ' हटके ' आणि 'स्पेशल ' असेल. मी आता वाट बघतेय परत एकदा पॅंगॉंग लेकची असीम शांतता अनुभवण्याची …

Post Image